" ध्यास विकासाचा गुणवत्ता वाढीचा "

झेप यशाची : थोर संत

थोर संत

         प.पु राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज 


जैन धर्मियांचे आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांचा  जन्म श्रावण शुक्ल प्रतिपद २७ जुलै १९०० साली आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यामधील चिचोंडी या गावी झाला. त्यांचे नाव नेमीचंद होते. त्यांच्या वडिलांचे नाव देवीचंदजी गुगळे आणि आईचे नाव हुलसाबाई.  मोठ्या भावाचे नाव उत्तमचंदजी  होते. आनंदऋषीजी लहानपणासुनच पवित्र होते, त्यांचे गुरू रत्न ऋषीजी महाराज यांच्या कडून त्यांना लहानपनापासुनच आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले.
आनंदऋषीजीनी वयाच्या १३व्या वर्षी त्यांचे सर्व आयुष्य जैन संत म्हणून व्यथित करण्याचे ठरविले. त्यांनी ७ डिसेंबर १९१३ साली(मार्गशिस शुक्ल नवमी) अहमदनगर जिल्हातील मिरी या गावी दिक्षा घेतली, त्यावेळी त्यांना आनंदऋषीजी महाराज हे नाव देण्यात आले.
आनंदऋषीजीनी पंडित राजधरी त्रिपाठी यांच्याकडून संस्कृत आणि प्राकृत शिक्षणास सुरुवात केली. त्यांनी १९२० साली अहमदनगर येथे पहिले प्रवचन दिले.
आनंदऋषीजीनी पुढे रत्नऋषीजी सोबत जैन धर्माच्या प्रसार व प्रसाराचे कार्य सुरु केले. जैन धर्मानुसार साधु किंवा साध्वी यांनी एका जागेवर न थांबता (आजारपण, वृध्तत्व वगळता) विहार करत राहिले पाहिजे. चातुर्मासात संत गृहस्ताच्या विंनतीवरुन एका ठिकाणी वास्तव्य करु शकतात.
रत्नऋषीजी महाराज यांच्या १९२७ साली अलीपुर येथील (संथारा) मॄत्युनंतर आनंदऋषीजीनी त्यांच्या गुरुशिवाय हिंगणघाट येथे पहिला चार्तमास केला. १९३१ साली आनंदऋषीजी यांच्या बरोबर झालेल्या धार्मिक चर्चेनंतर जैन धर्म दिवाकर महाराज यांना आनंदऋषीजीची आचार्य होण्याची क्षमता जाणवली.
आचार्य आनंदऋषीजींनी २५ नोव्हेबर १९३६ साली श्री. तिलोक रत्न स्थानकवासी जैन धार्मिक परिक्षा बोर्डची स्थापना केली.
१९५२ साली राजस्थान मध्ये सादडी येथे झालेल्या साधु संमेलन मध्ये त्यांना जैन श्रीमान संघाचा प्रधान म्हणुन घोषीत करण्यात आले. १३ मे १९६४ साली (फाल्गुन शुक्ल एकादशी) आनंदऋषीजी श्रीमान संघाचे दुसरे आचार्य झाले, याचा समारोह राजस्थान येथील अजमेर येथे झाला.
आनंदऋषीजी १९७४ साली त्यांचा मुंबई येथील चार्तमास पुर्ण करुन पुण्याला आले. पुण्यात शनिवार वाडा येथे त्यांचे भव्य स्वागत समारंभ करण्यात आला. १३ फेब्रुवारी १९७५ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव नाईक यांनी त्यांना राष्ट्र संत म्हणुन गैरविले. त्याच वर्षी आनंद फाऊंनडेशनची स्थापना झाली हे त्यांचे ७५व्या वाढदिवसाचे वर्ष होते.
आनंदऋषीजींनी २८ मार्च १९९२ साली अहमदनगर येथे त्यांचा मॄत्यु झाला. अहमदनगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिट्ल हे त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात  आहे.

संत नरहरी सोनार
श्री संत नरहरी सोनार यांचा जन्‍म देवगिरी येथे झाला. त्‍यांचे वडिल दिनानाथ परंपरागत सोनार काम करीत ते श्रीमंत होते. पुढे ते पंढरीस येवून स्‍थायिक झाले. संत नरहरी सोनार कट्टर शिवोपासक होते. ते पंढरीत असून कधीही पांडुरंगाच्‍या दर्शनास गेले नाहीत. एकदा एका सावकाराने पांडुरंगासाठी सोन्याचा करदोडा करण्‍यास सांगितला. त्‍यांनी तो सुंदर बनवून दिला. सावकाराने तो करदोडा पांडुरंगाच्‍या कमरेस बांधण्‍याचा प्रयत्‍न केला तेंव्‍हा तो खूपच मोठा झाला तेव्‍हां सावकाराने प्रत्‍यक्ष पांडुरंगाचे कमरेचे माप घेण्‍यासाठी संत नरहरी सोनार यांना आग्रह धरला. ते कट्टर शिवोपासक असल्‍याने पांडुरंगाचे दर्शन नको म्‍हणून त्‍यांनी डोळयास पट्टी बांधून कमरेचे माप घेण्‍याचा प्रयत्‍न केला असता त्‍यांच्‍या हातास स्‍पर्श झाला त्‍यावेळी त्‍यांना हातास पिंडीचा स्‍पर्श झाला व पट्टी काढून पहातात तर श्री पांडुरंगाची स्मित हास्‍य करणारी मूर्ती दिसली. असा बर्‍याचवेळा त्‍यांना अनुभव आल्‍यानंतर शिव व विष्‍णु दोघे एकच; दोघात व्‍दैत नाही याची साक्ष पटली. पुढे ते पांडुरंगाचे निस्सीम भक्‍त झाले.

रामचंद्रदास कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्यूत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती.
नरहरी सोनाराच्या नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. 'सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई' 'शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा' माझे प्रेम तुझे पायी' आणि देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार' अभंग प्रसिद्ध आहेत.
नरहरी सोनार म्हणतात, 'देवा, मी तुझा सोनार आहे, आणि मी नेहमी तुझ्या नामाचाच व्यवहार करीत असतो. फुललेल्या निखाऱ्यांची शेगडी-बागेसरी म्हणजे माझा देह आहे. त्यात जीवाशिवाचं सोनं घातलेलं आहे. सत्त्व, रज, तम या तीन गुणांची मूस मी तयार केली आहे आणि त्यात ब्रह्मारस ओतला आहे. जीवाशिवाच्या फुंकणीनं मी या धगधगत्या आगीत, ती शिलगावण्यासाठी, फुंक मारतो आहे. म्हणून त्यात माझ्या अंतरात्म्याचं सोनं तावून-सुलाखून निघतं आहे. त्या तप्त झालेल्या सुवर्णाला रात्रं-दिवस, ठोकाठोकी करून मी आकार द्यायचा प्रयत्न करतो आहे.'

नरहरी सोनार म्हणतात, 'देवा, मी तुझा सोनार आहे, आणि मी नेहमी तुझ्या नामाचाच व्यवहार करीत असतो. फुललेल्या निखाऱ्यांची शेगडी-बागेसरी म्हणजे माझा देह आहे. त्यात जीवाशिवाचं सोनं घातलेलं आहे. सत्त्व, रज, तम या तीन गुणांची मूस मी तयार केली आहे आणि त्यात ब्रह्मारस ओतला आहे. जीवाशिवाच्या फुंकणीनं मी या धगधगत्या आगीत, ती शिलगावण्यासाठी, फुंक मारतो आहे. म्हणून त्यात माझ्या अंतरात्म्याचं सोनं तावून-सुलाखून निघतं आहे. त्या तप्त झालेल्या सुवर्णाला रात्रं-दिवस, ठोकाठोकी करून मी आकार द्यायचा प्रयत्न करतो आहे.'

आपल्या सर्व शक्ती, कौशल्य आणि तन-मन-धन अर्पून आपण स्वीकारलेले काम निष्ठापूर्वक केले, तर यश, कीतीर्, वैभव आपल्या पायाशी लोळण घेणारच आहे. म्हणूनच 'यात अर्थ नाही, त्यात अर्थ नाही' असे म्हणत बसण्यापेक्षा जे काम स्वीकारले आहे, त्यालाच दिव्यत्वापर्यंत नेण्याचा चंग बांधला, आणि सर्व शक्ती व मन एकवटून त्यावरच लक्ष केंदित केले, तर कोणत्याही व्यवसायातून अद्भुत वाटावे असे चमत्कार घडू शकतात, हे आपण आज जगात पाहतो आहोत. हे आपणही करू शकतो, ही भावना मनात जागी झाली, तर स्वकर्मात रत राहूनही दिव्यत्वाची प्रचिती येऊ शकते.

यादवकालीन संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. व्यवसाय करणारेही संत आहेत. गोरोबा (गोरा कुंभार), सावतोबा (सावता माळी) यांच्या नावातच त्यांचा व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते. विविध वाड्.मयेतिहासात त्यांचा 'नरहरी सोनार' असा उल्लेख केला जातो.

वारकरी संप्रदायाच्या संत नामावलीतील बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत होते. ते विविध व्यवसाय करीत असल्यानं त्यांच्या लेखनात विविध व्यवसायांतील शब्द आले व त्यामुळंही मराठी भाषा समृद्ध व संपन्न झाली. (तिचा शब्दकोशही समृद्ध व संपन्न झाला.)

यादवकालात शिवांचे (शंकराचे) उपासक 'शैव' आणि विष्णूचे (विठ्ठलाचे) उपासक 'वैष्णव' या दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता. या दोन्ही संप्रदायांतील जे समताभिमानी होते, त्यांच्यापैकी काही जणांमध्ये अन्य मतांबद्दल व संप्रदायाबद्दल दुरावाही होतो. ज्ञानदेवांनी शिव आणि विष्णू ही एकाच परमेश्वराची नावं आहेत, अशी 'हरिहरैक्यां'ची समन्वयवादी भूमिका घेतली. त्यामुळं या दोन्ही संप्रदायांतील दुरावा व एकमेकांविषयीचा भेदभाव नाहीसा झाला. त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून नरहरी महाराजांच्या जीवनाचा उल्लेख करायला हवा
ज्ञानदेवांनी जी शैव आणि वैष्णव यांच्यामधील एकात्मतेची अपेक्षा केली, ती नरहरी महाराजांनी प्रत्यक्ष आपल्या आचरणाद्वारे पूर्ण केली. ते प्रारंभी नाथ संप्रदायिक (शिवोपासक) होते. 'कटिसूत्र' प्रसंगानंतर ते वारकरी (विठ्ठलोपासक) झाले, कारण त्यांना शिव आणि विष्णू यांच्यामधील अभेद जाणवला. ज्ञानदेवांचे वडील बंधू निवृत्तिनाथ हे नाथसंप्रदायिक होते व तेच ज्ञानदेवांचे गुरुही होते. त्यामुळं ज्ञानदेव गुरुपरंपरेनं नाथसंप्रदायिक होते. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे विठ्ठलोपासक असल्यानं वैष्णव होते. म्हणजे ज्ञानदेव घराण्याच्या परंपरेनं वैष्णव होते, वारकरी होते.

संत मुक्ताबाई


मुक्ताबाई या ज्ञानेश्वरांच्या सर्वात धाकट्या होत्या. मुक्ताबाईंचे विचार अत्यंत साधे व परखड होते. त्यांना मराठीच्या पहिल्या कवयित्री समजले जाते. त्यांनी जवळपास ४० अभंग लिहीले. यात ’ताटीच्या अभंगांचा’ समावेश होतो. मुक्ताबाई संताची व्याख्या करताना म्हणतात "जेणे संत व्हावे तेणे लोक बोलने सोसावे" . योगी चांगदेवांनी मुक्ताबाईंना आपले गुरु स्विकारले होते. ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर मुक्ताबाई व निवृत्तीनाथ हे तापी नदीच्या परिसरात धार्मिक स्थळांना भेट देण्यास गेले होते.तेथे विजेच्या कडकडात त्या लिन झाल्या.  जिच्यामुळे मराठी साहित्याचे दालन भावसंपन्न झालेले असून, जिने मायमराठीच्या सारस्वतात भक्तीचा मला फुलविलेला आहे. अशा ज्ञानदेवाच्या भगिनी मुक्ताबाई हिचा जन्म इंद्रायणीतीरी वसलेल्या आळंदीच्या गावाजवळील सिद्धबेटावर अश्विन शुद्ध प्रतिपदा शुक्रवार शके १२०१ म्हणजेच इ. सन. १२७९ मध्ये झाला. त्यांच्या आई-वडिलांचे मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव हे होय.

मात्यापित्यांच्या या देहत्यागानंतर या अनन्य साधारण कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर  पडली. ती तितक्याच समर्थपणे तिने उचलली आणि पेलली. त्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या बालवयातच मुक्ताई प्रौढ गंभीर, सोशिक समंजस बनली. हळव्या निरागस वयात जीवनाच्या वास्तव सत्याकडे आणि कठोर स्वरूपाकडे निर्लीप्तपणे पाहण्याचे प्रगल्भ प्रौढत्व तिच्यात आलेले होते. मुक्ताबाईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील. सर्व तत्कालीन संतांनी एकमुखाने मुक्ताबाईचा ज्ञानाधिकार मान्य केला. तिचा आदेश स्वीकारला. मुक्ताबाईचे गुरु म्हणजे तिचेच मोठे बंधू संत निवृत्तीनाथ ज्यांना मुक्ताबाईंनी गुरुमंत्र दिला ते म्हणजे विसोबा खेचर आणि हठयोगी चांगदेव हे होत.

मुक्ताबाईंनी बालपणीच त्यांच्या समकालीन समाजाचे उग्र कठोर वास्तव अनुभवले आणि ते पचवून लौकिक जीवनसंघर्षाकडे पाठही फिरविली. त्यांच्या वाणीत सांसारिक सुखदुःखाचा वा क्लेश पीडांचा प्रतिसाद नाही. सारे जीवनच त्यांनी अलौकिक रंगात रमवून टाकले आहे. मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांच्या संत मंडळीतील श्रेष्ठांनादेखील आपल्या आध्यात्मिक अधिकार बळावर स्पष्टोक्तीच्या सुरात जागविले आहे.  मुक्ताबाईंनी रचलेल्या अभंगाची संख्या जरी मोजकीच असली तरी त्यांच्या अभंगवाणीतूनही त्यांच्या प्रद्नेची, विचाराची भव्यता आणि उत्तुंग कल्पनेची दिव्यता अनुभवायला मिळते. त्यांच्या अभंगाच्या ओळी ओळीतून, शब्दाशब्दातून त्यांचा परिपूर्ण अध्यात्माधिकार, योगसामर्थ्य, प्रौढ प्रगल्भ जाण, अविचल आत्मविश्वास यांचे सुशांत दर्शन घडत राहते. मुक्ताबाईंनी ताटीचे अकरा अभंग लिहिले आहेत. तसेच हरिपाठाचे अभंगही लिहिले आहेत. हरिपाठ म्हणजे मुक्ताबाईचे अनुभवकणच आहेत. आत्मरुपाचा साक्षात्कार शब्दात व्यक्त करण्याचा हा त्यांचा एक अविष्कार आहे.



संत मुक्ताबाई यांचे अभंग


मुक्तपणे अखंड त्यासी पै फावले l
मुक्तची घडले हरीच्या पाठी l
रामकृष्णे मुक्त जाले पै अनंता l
तरले पतीत युगायुगी l
कृष्णनामे जीव सदा झाले शिव l
वैकुंठ राणिव मुक्त सदा l
मुक्ताई संजीवन मुक्तमुक्ती कोठे l
जाल पै निवाडे हरिरूप l
२)अखंड जयाला देवाचा शेजार l
कारे अहंकार नाही गेला ll
मान अपमान वाढविसी हेवा l
दिवस असता दिवा हाती घेसी l
परब्रह्मासंगे नित्य तुझा खेळ l
आंधळ्याचे डोहाळे का बा झाले l
कल्पतरू तळवटी इच्छिती ते गोष्टी l
अद्यापि नरोटी राहिली का l
घरी कामधेनु ताक मागू जाय l
ऐसा द्वाड आहे जगा माजी l
म्हणे मुक्ताबाई जाई ना दर्शना l
आधी अभिमाना दूर करा ll

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकीं श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होत. त्यांचा जन्म माघ सुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स्. १८४५) या दिवशी गोंदवले बुद्रुक या गांवी झाला. हे गांव सातारा जिल्ह्यांतील माण तालुक्यांत असून ते सातारा-पंढरपूर रस्त्यावर सातार्‍यापासून चाळीस मैलावर आहे. त्यांचे घराण्यांत विठ्ठलभक्ति व पंढरीची वारी असून पूर्वज सदाचार संपन्न व लौकिकवान होते. ते घरी थोडी शेती करून कुलकर्णीपणाचें काम करीत. श्रीमहाराजांचे मूळ नांव गणेश रावजी घुगरदरे. स्मरणशक्ति, चलाख बुद्धि, पुढारीपणा, निर्भय वृत्ति, एकांतप्रियता, रामनामाची आवड ह्या गोष्टी श्रीमहाराजांमध्यें लहानपणापासूनच होत्या. ते नऊ वर्षांचे असतांना गुरु शोधार्थ घर सोडून गेले. पण त्यांच्या वडिलांनी ते कोल्हापुरास आहेत असे कळल्यावर त्यांनी श्रीमहाराजांना घरी परत आणले. त्यांचे वयाच्या अकराव्या वर्षीं लग्न करण्यांत आले, परंतु त्यांचे प्रपंचांत चित्त रमेना, आणि ते लवकरच गुरुशोधार्थ पुन्हां घर सोडून निघून गेले. त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा सत्पुरुषांच्या भेटी भेतल्या. पण त्यांच्या मनाचें समाधान झाले नाही. ते विशेषतः उत्तर भारतात गुरुशोधार्थ हिंडले. शेवटी श्रीरामदासस्वामींच्या परंपरेंतील एक थोर सत्पुरुष श्रीरामकृष्ण यांनी श्रीमहाराजांना दर्शन दिले आणि त्यांना नांदेड जवळील येहळेगांव या गावी श्रीतुकारामचैतन्य यांचेकडे जाण्याचा आदेश दिला.

या आदेशानुसार श्रीमहाराज श्रीतुकामाईंकडे गेले. तेथे नऊ महिने राहून त्यांनी एकनिष्ठेनें गुरुसेवा केली, आणि ते देहबुद्धिविरहित व पूर्ण ज्ञानी झाले. श्रीतुकामाईंनी त्यांचे 'ब्रह्मचैतन्य' असे नांव ठेवलें, आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली.

सद्‍गुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्रीमहाराजांनी हजारों लोकांना रामभक्तीला लावलें. त्यांचे शिष्य-प्रशिष्य विशेषतः मध्यमवर्गीय असून ते महाराष्ट्र व कर्नाटकांत बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानांतही आहेत. त्यांची प्रथम पत्‍नी वारल्यानंतर त्यांनी जन्मांध मुलीशी लग्न केलें. त्यांनी आपल्या घरीं आणि इतरत्र अनेक ठिकाणीं श्रीराममंदिरांची स्थापना करून उपासनेची केंद्रें निर्माण केली.

त्यांनी असंख्य लोकांना व्यसनें, दुराचरण, दुरभिमान, संसारचिंता यांपासून सोडविले. कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले. यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचनें व भजनकीर्तनें यांचा उपयोग केला. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता. त्यांनी गोरगरीबांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले. गोरक्षण, अन्नदान, भावी काळांत मार्गदर्शक ठरतील असे उद्योग, वैदिक अनुष्ठानें, नामजप, भजनसप्ताह, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावलें. आधुनिक सुशिक्षितांमधील अश्रद्धा घालवून त्यांच्यामध्येंही धर्माबद्दल व भक्तीबद्दल आदर उत्पन्न केला. अशा रीतीनें लोकांमध्यें धर्मजागृति केली. नामस्मरण हें सर्वश्रेष्ठ साधन आहे असें त्यांनी कळकळीनें व बुद्धीला पटेल अशा रीतीनें सांगितलें. वासनारहित झालेल्या त्यांच्याकडून अनेक चमत्कार घडले हें जरी खरें, तथापि पापी लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावलें हा त्यांचा सर्वांत मोठा चमत्कार म्हणतां येईल. लोकांना नामस्मरणाच्या मार्गाला लावून प्रपंच व परमार्थ यांचे मधुर मीलन कसें करावें हें शिकविण्यासाठीं त्यांनी आमरण खटाटोप केला, आणि मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ (२२ डिसेंबर १९१३) या दिवशीं गोंदवलें मुक्कामी त्यांनी देह ठेवला.

[
श्रीब्रह्मचैतन्य महाराज कृत ॥ अमृतघुटका ॥ या पुस्तिकेवरून ]

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ भारत भ्रमण करुन अक्कलकोटला का आले यामागे काहीतरी रुढी संकेत असावा असे वाटते म्हणूनच अक्कलकोट हे आज प्रज्ञाक्षेत्र मानले जाते.

सोलापूर शहरापासून अवघ्या २४ मैलाच्या अंतरावर श्री क्षेत्र अक्कलकोट आहे. अक्कलकोट मध्ये एकून १२८ खेडयांचा तालुक्यात समावेश करण्यात आला आहे. मुंबई, मद्रास रेल्वे ब्रॉडगेज मार्गावर अक्कलकोट हे एक मध्यरेल्वेचे छोटेसे स्थानक आहे. रेल्वे स्थानकापासून हे गाव ७ मैल अंतरावर आहे. गावात जाण्यास एस.टी. महामंडळाने सोई करुन दिल्या आहे. श्री क्षेत्र अक्कलकोट पासून गाणगापूर, तुळजापूर. पंढरपूर, गुलगर्बा ही तीर्थक्षेत्रे फ़ारच जवळ आहेत. येथूनच १६ मैल अंतरावर गोगांव स्वामी मंदिर (खैराट मार्ग) आहे. बोरी व हरणा या दोन नद्या अक्कलकोट परिसरातून वाहतात या क्षेत्रात आपल्याला ह्या दोन्ही नद्यांचा संगम पहावयास मिळतो. या संगमाजवळ श्री संगमेश्वराचे अतिशय पुरातन मंदिर आहे. मंगरुळ, तडवळ ही तालुक्यातील मोठी गावे आहेत. तसेच मंगरुळ व दुधनी हे गाव विडयाच्या पानासाठी प्रसिध्द आहे. 

श्री स्वामी समर्थ महाराज ओळख:

अक्कलकोट स्वामींची ओळख पाहली असता ती श्री नृसिंह सरस्वती अशा भुमिकेस अनूसरुन आहे. श्री नृसिंह सरस्वती हे श्रीशैल्य येथे कर्दळी वनात समाधीस्त बसले होते त्यांच्या समाधीचा कालावधी हा तीनशे वर्षाचा होता. महाराज समाधी अवस्थेत असतांना उध्दव नावाचा लाकूडतोडया त्या जंगलात लाकूड तोडण्यास गेला. लाकूड तोडता-तोडता उध्दवची कुऱ्हाड ही चूकून एका वारुळावर पडली कुऱ्हाड पडल्यामूळे महाराजांची समाधी भंग झाली व त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रगट झाले. ती कुऱ्हाड पडल्यामूळे महाराजांना मांडीला जखम झाली होती महाराजांना झालेल्या जखमेतून रक्त निघत असल्यामुळे उध्दवाने तेथील वन‍औषधीचा लेप महारजाच्या जखमेला लावून दिला. स्वामींना ज्या ठिकाणी जखम झाली होती त्याठिकाणी त्या जखमेची खूण आजही आपणास दिसून येते. त्यानंतर स्वामींनी उध्दवला आशिर्वाद दिला व ते तेथून पुन्हा भक्तांच्या कल्याणाकरीता निघाले. महाराज हे दत्त्‍अवतारी होते असे स्वामीभक्त मानतात.

महाराजांची शरीरयष्टी अत्यंत धिप्पाड होती. कांती तेज:पुंज होती. त्यांचा वर्ण गोरा होता ते अजानबाहू होते. त्यांचा चेहरा उग्र होता, संत्र्याच्या रंगाप्रमाणे त्यांच्या तोंडावर तेज होते. त्यांच्या कानाच्या पाळ्या विशाल असून ते वयातील होते. पण जेव्हा ते चालायचे तेव्हा साध्या माणसांना त्यांच्याबरोबर पळत जावे लागायचे. महाराज नेहमी लंगोटी नेसत असत त्यांच बरोबर महाराजांची वृत्ती विलक्ष होती. नित्यनियम असे काही नव्हते. दूसऱ्याने स्नान घालणे, जेवण घालणे इत्यादी मात्र करावे लागत असे. तसे महाराज कोठेपण जात तेव्हा बोलतांना हूक्का ओढणे तर चालूच असायचे पण दर घटकेस त्यांची वृत्ती वेगळी असायची इतके असून त्यांच्यातील पवित्रता, मांगल्य कधीही भंग पावलेले नव्हते, म्हणून हजारो भक्त आजही स्वामींच्या दर्शनाला श्री क्षेत्र अक्क्लकोट येथे येतात.


अक्कलकोट संस्थान:

अक्कलकोट हे इ.स. १९४८ पर्यंत राजधानीचे ठिकाण होते. अक्कलकोटचे जहांगीर "फत्तेसिंग भोसले" (पूर्वीचे नाव राणोजी लोखंडे) यास छत्रपती शाहू महाराजांनी इ.स. १६१२ मध्ये वंशपरंपरेने आपली राजधानी दिली. इ.स. १८४८ मध्ये सातारचे राज्य खल्लसा झाले त्यामुळे अक्कलकोट संस्थानाचा सर्व कारभार हा ब्रिटीश सरकारच्या अधिपत्याखाली आला होता असे म्हणतात.


श्री संत भगवान बाबा
श्री संत भगवानबाबा
पवित्र ते कुळ पावन तो देश |
जेथे हरीचे दास जन्म घेती ||

अवघ्या भारत वर्षात वारकरी संप्रदायाचा झेंडा फडकाविणारे , लखलखत्या विजेसमान प्रभावी वाणी असणारे  सर्व समाज तळागाळातून ढवळून काढून त्यांना योग्य दिशा देणारे युगप्रवर्तक म्हणजे - राजयोगी  श्री संत भगवान बाबा .

संत श्री भगवान बाबा हे एक वारकरी संप्रदयातील प्रबोधनकार होते . त्यांचा जन्म २९ जुलै १८९६ ला सुपे सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे झाला . १८ व्या शतकात मराठवाड्याला  लागुनच असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात निजामाची राजवट होती . त्यांच्या  अन्यायाला आणि जुलुमाला जनता त्रासली होती. अशातच समाजाला भगवान बाबासारखे राष्ट्र संत भेटले ज्यामुळे सामाज परिवर्तनास गती आली .त्यांनी कीर्तनातून समाजप्रबोधनाचे कार्य करून समाजाला योग्य दिशा दाखवली. भगवानबाबांनी अत्यंत अडाणी, दीनदुबळ्या समाजाला नवचैतन्य दिले. भगवानबाबा सन  १९५८ साली भगवान गडाचे  काम पूर्ण करून लोककल्याणासाठी या गडावर  आजन्म झटत राहिले. आजही या गडावर दसऱ्या निमित्त  बाबांचा मोठा भक्त गण जमतो. भगवानगडावर भाविक भक्तांसाठी अतिशय चांगल्या प्रकारची सोय केलेली आहे.

भगवानबाबांनी अंधश्रधा निर्मुलन , शैक्षणिक कार्य ,नारळी सप्ताह ,पंढरपूर वारी या सारखे समाज हिताची  अनेक कामे केली. समाजात बंधुभाव,एकात्मता ,जागृती, हरिनामाची गोडी निर्माण करण्या मागे भगवान बाबाचा मोठा वाटा आहे.  " समाज सुधारण्यासाठी समाजाने शिकले पाहिजे " असे त्यांचे ठाम मत होते. यासाठी त्यांनी शाळा काढल्या.

भगवानबाबांनी समता , बंधुता स्थापन करण्यासाठी उभे आयुष्य वेचले . १९ जानेवारी १९६५ ला  पुण्यातील रुबी दवाखान्यात बाबांची प्राणज्योत मालवली .बाबांचा भक्तिरसाचा वारसा आजही शेकडो भाविक भक्त जपताना दिसताहेत आणि उत्तरोत्तर तो वाढतच जाईल यात शंकाच नाही .



"
भगवंतावर प्रेम करा. वेळेप्रमाणे सर्वांचे प्रेम बदलते . भगवंताचे प्रेम बदलत नाही. ते चिरंतन असते , ईश्वर हा आपला सखा आहे . तोच पालनकर्ता आहे. आपले कार्य नीतीला धरून असावे म्हणजे परमेश्वर आपल्याला त्या कामात यश दिल्याशिवाय रहात नाही. एकाचाच  हा सर्व पसारा असल्यामुळे समान बंधुत्वाची जाणीव असणे अगत्याचे आहे."

हेवा - दावा , मत्सर आपण ज्याचा करणार तोच ईश्वराचा अंश असेल तर आपण भगवंतालाच नाराज करणार का कि जो आपला निर्माता आहे . 



संत कवी बहिणाबाई
एक थोर मराठी स्त्री संत व कवी.
स्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई यांसह बहिणाबाईंचे स्थान मानावे लागेल.
बहिणाबाईंचा जन्म, गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, वैजापूर तालुक्‍यातील देवगांव (रंगार्याचे) येथे शके १५५१ मध्‍ये ब्राम्हण कुटुंबात झाला. तिच्‍या आईचे नांव जानकी व पित्‍याचे नांव आऊजी. माता-पित्‍यानी तिचा विवाह वयाच्‍या पाचव्या वर्षी त्याच गावातील पाठक कुटुम्बात लावला.

संत बहिणाबाईना लहानपणापासुनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा – कीतने, पुराण-श्रवण आणि सत्‍पुरूषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण तिची संसारावरील आसक्‍ती कमी होवून परमार्थीक वृत्ती वाढत गेली. घरची गरीबी,शि़क्षणाचा अभाव, तरीही समाधानी वॄत्ती व संतवृत्तीला साजेशी पाण्डुरंगाची ओढ मनात होतीच. अखंड नामस्मरण चालू असे. शेतात काम करित असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडे.
पुढे कोल्‍हापूर वास्‍तव्‍यात जयराम स्‍वामीच्‍या कथा कीर्तनाने संत बहिणाबाईच्‍या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकोबाचे अभंग म्‍हणू लागली व तुकोबाचे दर्शनाचा ध्‍यास घेतला. तिला तुकोबारायाना सदगुरू करून त्‍यांचे अनुग्रह व आर्शिवाद घ्‍यावयाचा होता. म्‍हणून रात्रंदिवस तुकोबाचे अभंग म्हणत त्‍यांचे ध्‍यान करू लागली शेवटी कार्तिक व. ५ शके १५६९ रोजी तुकोबारायानी स्‍वप्‍नात येवून गुरूपदेश दिला. बहिणाबाईचे सारे जीवन गुरूबोधामुळे बदलून गेले. तिनें आपले गुरु संत तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे.
त्यांचे वर्णन करताना गेल्या शतकातील एक श्रेष्ठ सन्त, सन्तचरित्रकार आणि 'श्री गजानन विजय'कर्ते सन्तकवी दासगणू महाराज लिहितात .. पहा केवढा अधिकार .. ऋणि तिचा परमेश्वर ... या साध्वीची समाधी 'शेऊर' या गावी आहे.
चमत्कार
असे सांगतात की त्यांना त्यांच्या पूर्वीच्या तेरा जन्मांचे स्मरण होते. या साध्वीच्या चरित्रातील एक प्रसंग ज्ञात आहे तो असा: नेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना त्याना अचानक थंडी वाजून ताप भरला.परंतू पाण्डुरंगाच्या भेटीची केवढी तळमळ, की त्यानी अंगावरच्या फाटक्या घोंगडीला विनंती केली, " ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवधी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगिन." ही घोंगडी त्यानी एका झाडावर ठेवली व त्या वारीस निघून गेल्या. त्या सुखरूप परत येईपर्यन्त ते झाड हीव भरल्यामुळे थड्थड हालत होते.

संत बहिणाबाई यांनी सुमारे ४७३ अभंगांची रचना केली आहे.
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस! , या प्रसिद्ध अभंगाची रचना साध्वी बहिणाबाई यांचीच. सम्पूर्ण अभंग असा -
संत कृपा झाली इमारत फळा आली |
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया |
नामा तयाचा किन्कर तेणे विस्तरिले आवार |
जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत |
तुका झालासे कळस भजन करा सावकाश |
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा.||



1 comment:

  1. संत कवयित्री बहिणाबाई आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी या दोन्ही भिन्न स्त्रिया आहेत.
    संत कवयित्री बहिणाबाई यांची दिलेली सर्व माहिती बरोबर असून यात संत कवी ऐवजी संत कवयित्री असा उल्लेख हवा.
    सदर लेखातील फोटो चुकीचा असून तो कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आहे.
    (तुकारामांच्या काळात चष्मा अस्तित्वातच नव्हता.)
    1) कृपया सदर चुकीचा फोटो बदलावा.
    2) 'संत कवी' ऐवजी 'संत कवयित्री' असा उल्लेख करावा.

    ReplyDelete